भाजपचे बोरिवली विधानसभेचे उमेदवार संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे कान टोचले. “कार्यालयाच्या उद्घाटनातून युतीचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जे वातावरण निर्माण केले आहे, त्याप्रमाणे मी सर्वांचे अभिनंदन करतो. सुनील राणे म्हणाले की, बोरिवलीची 1978 पासूनची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, समाजाचे भले करा. माझी एकच विनंती आहे की, उरलेल्या दिवसात कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये. पक्ष मोठा करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे आणि हे करायचे असेल तर स्वतःला लहान करावे लागेल. स्वतःला लहान करा आणि मग जगण्याचा आनंद पाहा. लोक म्हणतात, तुमच्यात ताकद आणि ऊर्जा कुठून येते. मी नेहमी लहानपणापासूनच काम करतो. प्रत्येकजण माझ्यापेक्षा मोठा आहे असे मानून मी काम करतो”, असं गोपाळ शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले.
पीयूष गोयल गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणाले
यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. “संजय उपाध्याय यांना आपण सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निवडून आणू. येत्या काही दिवसांत बोरिवली हा मुंबईतील आघाडीचा विधानसभा मतदारसंघ बनणार आहे. विधानसभा निवडणुकीत सुनील राणे, मी आणि गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने नवा विक्रम प्रस्थापित करू”, असं पीयूष गोयल म्हणाले.
