विद्यार्थ्यांनी घेतला जाणून गावचा इतिहास
अकोले - अकोले तालुक्यातील गणोर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुशांत आरोटे यांनी गणोरे गावच्या नावाचा इतिहास समजावून सांगितला. पुरातन गणपती मंदिरावरून या गावाला गणोरे हे नाव पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले या सोबतच गावातील ग्रामदैवत अंबिका माता मंदिर, नदीवरील पाण्याची टाके, रामाकुंड यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची सखोल माहिती ही दिली. तसेच गावाचा भौगोलिक अभ्यासही घेतला.
नदीचा उगम, नदीवरील धरण,गावच्या सीमा, शिव रस्ते सोसायटी, ग्रामपंचायत, शाळा व कॉलेज यांचा या इतिहासात समावेश होता. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना देण्यासाठी या माहिती सत्रात त्यांना प्रत्यक्ष स्थळांना भेटी घडवून आणण्यात आल्या. अंबिका माता मंदिर, गणपती मंदिर, आणि आढळा नदी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यांनी स्थानिक पुरातन वारसा व त्याचा आपला दैनंदिन जीवनाशी असलेल्या संबंधावर चर्चा केली. जिल्ह्यातील २८ शाळांची निवड पीएमसी योजनेत झाली आहे.
या योजनेत गणोरे जिल्हा परिषद शाळेची देखील पीएमश्री योजनेसाठी निवड झाल्याने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रांगोळी, चित्रकला, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व व वाद विवाद अशा अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुनीता फटांगरे सुशांत आरोटे,जगन्नाथ आहेर, मुख्याध्यापक अशोक नेहर, शिक्षक अरुणा दातीर, बाबासाहेब गवांदे तात्यासाहेब मंडलिक, भगवंत साबळे अश्विनी झिरमीटे आणि अस्मिता ढमाळे यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांना त्यांच्या गावचा अभिमान वाटावा आणि तेथील वारसा जतन करण्याचे प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.