श्री नरेश राऊत फाउंडेशन च्या वतीने अकोले तालुक्यातील पाडाळणे व परिसरातील गावांसाठी अत्यावश्यक सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
अकोले प्रतिनिधी- केलवड ता राहता येथील श्री नरेश राऊत फाउंडेशन च्या वतीने अकोले तालुक्यातील पाडाळणे व परिसरातील गावांसाठी अत्यावश्यक सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
जल्लोषपूर्ण वातावरणात फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश राऊत, सचिव प्रा लक्ष्मण गोरडे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार,प्रकाश टाकळकर, सरपंच रोहिणी बगाड, संचालक विलास महाले,रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत शिवाई फाउंडेशनचे अध्यक्ष राम तळेकर, अण्णासाहेब सावंत , राजेंद्र तळेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत पाडळणे येथे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष नरेश राऊत म्हणाले की, गावच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग किती आहे, त्यावरून मदत करू असे सांगत सर्वानी एकत्र काम केल्यास गावाची भरभराट होते व हे फक्त गाव एकत्र आले तर शक्य आहे. व्यवहार चोख असला पाहिजे, तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी, गावाला पाहिजे ती मदत करु असे सांगितले.मात्र गावात राजकारण आले की,आमची संस्था मदत करण्याचे थांबून घेते, असे सांगतानाच ग्रामस्थांनी एकत्र येत आदर्श गाव निर्माण करावा या साठी संस्था आपल्या बरोबर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फाऊंडेशनचे सचिव गोरडे म्हणाले की नरेश फाउंडेशन वंचित आणि दुर्लक्षित समाज घटकांसाठी शैक्षणिक व आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे.या बरोबरच महिला आणि युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देत आहे. जलसंधारण कृषी आणि पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवत आहे. हे करत असतानाच गाव आणि शाळांचा विकास फाउंडेशन मार्फत करत असल्याचे सांगत 2013 पासून आज पर्यंत केलेल्या कामाचा आलेख या वेळी मांडला. राजकारण विरहित असणार ही संस्था गावे दत्तक घेऊन विकास करत आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील शाळांना विशेषतः मुलींसाठी टॉयलेटचे बांधकाम करून देणे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आरो फिल्टर बसून देत आहे हे काम करत असताना संस्था शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाही. लोकार्पण करण्यात आलेली रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवेसाठी वापरा व अचानक घडलेल्या प्रसंगावर मात करा असे आवाहन करतानाच पाडळणे गावाने ग्रामपंचायतीचा ठराव दिल्यास हे गाव संस्था दत्तक घेईल व आरोग्यसेवा ही उपलब्ध करून देईल अशी इच्छा सचिव गोरडे यांनी व्यक्त केली.
माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर म्हणाले की,या आनंददायी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले, रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात फौंडेशन काम करते या क्षेत्रामुळे देशाची प्रगतीस हातभार लागतो. प्रास्तविकात फाउंडेशन चे संचालक विलास महाले यांनी अकोले तालुक्यात नरेश राऊत फाउंडेशन केलेल्या व करत असलेल्या कामांची माहिती दिली.
पाडळणे येथील जिल्हा परिषद शाळा व चिंचवणे येथील माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली आणि ह्या लेझीम पथकास नरेश फाउंडेशन अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले. ज्ञानेश्वर नवले,शिवाजी उगले, राम तळेकर यांनी आपल्या मनोगतातून गावच्या समस्या मांडत मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
सूत्रसंचालन विजय खिलारी यांनी केले तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत यांनी मानले.
