अकोले तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामांची राज्य शासनाने चौकशी समिती नेमुन कारवाई करावी
अकोले तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी समिती नेमुन त्या मार्फत तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनेच्या सर्व कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक अनंत महादु घाणे सह दिनेश शहा,सरपंच ढवळा भांगरे,काळु जाधव , देवराम भांगरे,पंढरी पेढेकर,सुनील पवार,तुकाराम खाडे रामदास पिचड यांचे सह खिरविरे येथे परिसरातील गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे .
अकोले तालुक्यात सध्या शेकडो कोटी रुपये खर्चाचे हर घर जल या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची कामे सुरू आहेत.काही कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर काही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने मोदी सरकारने लोकसभा निवडणुकांच्या अगोदर सदर योजनांना मंजुरी देऊन कामे सुरू झाली.
परंतु आजपावेतो तालुक्यातील एकही काम पूर्ण होऊन जनतेला पिण्यासाठी शाश्वत पाणी मिळाल्याचं ऐकीवात नाही. प्रत्येक गावात कामासंदर्भात ग्रामस्थांच्या खूप तक्रारी आहेत. त्यात निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे तसेच पाणी वितरण आणि पुरवठा यासाठी असलेली पाइपलाईन आवश्यक त्या खोलीत न गाडणे, तसेच यासाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरियलची गुणवत्ता, बांधकामासाठी कमीतकमी पाण्याचा वापर तर ब-याच ठिकाणी वरचेवर पाइपलाइन गाडली गेली आहे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आज मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी खिरविरे येथे जमलेल्या अनेक गावांतील कार्यकर्त्यांकडून समाजसेवक अनंत घाणे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.
सदर योजना फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांनी आपले खिसे भरण्यासाठी मंजूर करून आणल्या आहेत का असाही प्रश्न नागरीक विचारत आहेत सदर कोट्यवधी रुपयांच्या या योजनेचा लाभ जर जनतेला झाला नाही तर शासनाचा पैसा वाया जाऊन पुढे अनेक वर्षे सदर गावांतील योजनांना मंजुरी मिळणार नाही. यासाठी सरकारी कार्यालयात बसून योजना राबविणा-या अधिका-यांनी जनतेच्या वतीने केलेल्या आरोपांची शहानिशा करून दर्जेदार काम करुन नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार अनेक ठिकाणी काम 80 टक्क्यापर्यंत पुर्ण झाल्याचं दाखवलंय परंतु प्रत्यक्षात काम तेवढं झालंच नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. खिरविरे परिसरातील खिरविरे, एकदरे, पिंपळदरावाडी, बिताका, जायना वाडी,मानमोडी, कोकण वाडी, समशेरपुर, केळी रुम्हनवाडी, तसेच इतरही गावातील नागरिकांनी सदर योजनेच्या कामाची शासनाच्या चौकशी समितीकडुन तातडीने चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.तसेच या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना तातडीने टॅंकर द्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे
