सध्या सत्तेत येण्यासाठी जाती धर्माला प्राधान्य- प्रकाश आंबेडकर
चौऱ्यांशी वर्षांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा
अकोले प्रतिनिधी-
सद्या देशात सत्तेत येण्यासाठी सोपा मार्ग अवलंबला जातो तो म्हणजे जाती-जातीत,धर्मा-धर्मात वाद लावणे,भांडणे लावणे, इतिहासात जात धर्म ला प्राधान्य दिल्याने आपण पारतंत्र्यात गेलो.धर्म जात ही व्यक्तिगत बाब असली पाहिजे मात्र आज देशात जात-धर्माला प्राधान्य आले . आजच्या सरकारने नवीन पिढीचे तारुण्य बरबाद करण्यासाठी जात-धर्म पुढे आणले असल्याचा घणाघात ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे 27 एप्रिल 1941रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाल्यानंतर ८४ वर्षानी पदस्पर्श भवन येथे त्याचे नातु ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे कोतुळ येथे आले होते रविवारी सकाळी गावातून त्यांची भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले .गावात चाैका चाैकात त्याचे स्वागत करण्यात आले .यावेळी भाऊ दाजी देशमुख यांच्या निवासस्थानी व विद्यालयाला भेट देवून जान्हवी लॅान्स येथे जाहिर सभा पार पडली याप्रसंगी ॲड.प्रकाश आंबेडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड.संघराज रुपवते होते .तर या वेळी व्यासपीठावर आ.डॉ.किरण लहामटे, विजयराव वाकचौरे,बाळासाहेब नानासाहेब देशमुख,उद्योजक सुधीर साळवे,या कार्यक्रमाचे आयोजक उत्कर्षाताई रुपवते,रविंद्र देशमुख,राजेंद्र देशमुख ,सुरेश देशमुख, शांताराम संगारे, सागर शिंदे, राजेंद्र गवांदे, सुरेशराव देठे, बाळासाहेब साबळे आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड आंबेडकर म्हणाले की,आज आपले सैन्य पूर्णपणे तयार आहे. मात्र, आपल्या पॉलिटिकल लीडरशिपची ती इच्छा दिसत नाही. यासाठी २ मे २०२५ रोजी आपण हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने करणार आहोत, या सरकारकडे काही करण्याची इच्छा शक्ती राहिलेली नाही.
भाजपा हाच दहशतवादी विचाराचा पक्ष आहे.काश्मिर मधील आजही ६० टक्के कश्मिरी भारता बरोबर आहेत तर १५ % स्वतंत्र मागत आहे . केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले.अटारी व वाघा बॉर्डर १ मेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय घेतले.हा चांगला निर्णय आहे.
सिंधू जलवाटप करार रद्द नाही, सरकार जनतेशी खोटं बोलतयं
जलयुद्ध पुकारून सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत असले तरीदेखील भारत सरकार सिंधू जलवाटप करार रद्द केल्याबद्दल खोटं सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांसमोर भारत सरकारकडून सिंधू जलवाटप करारांतर्गत पाकिस्तानला पाणी बंद केल्याच्या संदर्भानॆ दिलेले पत्रच दाखवले. यात पाकिस्तानला जाणारे पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. आम्ही धरणातील पाणी सोडणार नाही, असाही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही. असा आरोप ॲड.आंबेडकर यांनी केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडिच्या राष्ट्रीय प्रवक्त्या उत्कर्षा ताई रुपवते यांनी कोतूळ गावातील ज्या शासकीय विश्रामगृहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्रांतीस थांबले होते, ती वास्तू दयनीय अवस्थेत असून त्याचा जिर्णोद्धार करून त्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार डॅा.किरण लहामटे व ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली.तसेच त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिला परिषदेला उजाळा दिला. सूत्रसंचालन पोपटराव सोनवणे व अजय पवार यांनी केले तर आभार संदीप बर्वे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदस्पर्श समितीचे अध्यक्ष गौतम रोकडे, सुरेश जगधने, नवनाथ वैराळ, प्रवीण साळवे,गणेश साळवे,गौतम रोकडे,संदीप बर्वे,प्रसिक सोनवणे, साळवे पेंटर,प्रकाश डोळस,रवींद्र देठे,सचिन व अविनाश गायकवाड, जे.के.वैराळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समाजाप्रती 24 तास सेवा देणारे डॉ.सोमनाथ मुटकुळे, डॉ.प्रदीप जोशी, डॉ.संतोष संगारे, डॉ.शिवाजी सोनवणे, डॉ.राजीव शिंदे,डॉ.भांडकोळी यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,संविधान पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तर चित्रकार गौतम साळवे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे रेखाटलेले चित्र प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले.
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील २७ एप्रिल हा पदस्पर्श सोहळा दिवस पुन्हा ऐतिहासिक ठरला. डॉ बाबासाहेब चौऱ्यांशी वर्षांपूर्वी देशमुखांच्या वाड्यात ज्या चोपाळ्यावर बसले त्या चोपाळ्यावर नातू प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना बसवून आठवणींना उजाळा दिला.
स्मारकाचा प्रश्न निकाली काढू -
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बाबासाहेबांच्या कोतूळ येथील विश्रामगृहाला स्मारक म्हणून विकसित करण्याची जी प्रक्रिया आहे ती तातडीने सुरू करू त्याचा विकास आराखडा तयार करून योग्य ती कार्यवाही करू अशी ग्वाही दिली.
माझे आजोबा स्व.भाऊ दाजी देशमुख व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात जो समतेचा संदेश समाजाला दिला तशाच प्रकारचा संदेश बाबासाहेबांची तिसरी व आमची चौथी पिढी एकत्रित आलो आणि समतेचा पुन्हा संदेश दिला.याचा सर्व कुतुबियांना अभिमान आहे.
-रवींद्र देशमुख,सचिव,भाऊ दाजी देशमुख प्रतिष्ठान, कोतूळ
