लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष
आदिवासी शेतकऱ्यांची पिकांची रोपे देण्याची मागणी
अकोले प्रतिनिधी-
अवकाळी पावसाने ४० गाव डांगाणातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले असून या कडे लोकप्रतिनिधी,शेतकरी नेते,प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.तरी प्रशासनाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व पिकांची रोपे शेतकऱ्यांना थेट द्यावी अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी रतनवाडी सोसायटी चे चेअरमन नरहरी इदे ,संतोष सोडणर,भाऊराव भांगरे, राजू मधे,नामदेव इदे, पांडुरंग पदमेरे, मच्छिन्द्र खाडे, मुकणे बाबा आदि शेतकऱ्यांनी ही मागणी केली.
अकोले तालुका हा आदिवासी व डोंगराळ तालुका असून येथे पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते मात्र या वर्षी भर उन्हाळ्यात जवळपास एक महिना अवकाळी पाऊस पडल्याने ४० गाव डांगाणातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमूग,ज्वारी,बाजरी ही पिके लावली मात्र त्यांचे या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. भात पेरणी थांबली व ज्यांनी पेरणी केली ती भातांची रोपे सडली आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही,साधी चक्करही मारली नाही.लोकप्रतिनिधीनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे आम्हाला कोणी वाली आहे की नाही असा सवाल हे आदिवासी शेतकरी करताना दिसत आहे.
माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड हे त्यांच्या काळात असे काही झाले तर स्वतः नुकसानीची पाहणी करायचे, जिल्हाधिकारी,तहसीलदार यांना फोन करून पंचनामे करायला लावायचे व नुकसान भरपाई मिळवून द्यायचे याची आठवण यावेळी आदिवासी शेतकऱ्यांनी काढली.
यावेळी पिकांचे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना थेट भात रोपे द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. व रोपे जर दिली नाही तर शेती ओसाड पडणार आहे असेही स्पष्ट केले.
भात पेरणी ही रोहिण्या निघाल्या की लगेच केल्या जातात. परंतु या वर्षी अवकाळी पावसामुळे रोपे तयार करण्यासाठी जी वावरे आहेत तिथे भुजनी झाली नाही व वावरे पूर्ण पाण्याने भरली आहेत व जमिनीला वापसा राहिला नाही. यामुळे शेतकरी खुप मोठया अडचणीत आला आहे.