समर्थ विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात; दिव्यांग साहसीवीर केशव भांगरे यांचा संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसमोर
अकोले प्रतिनिधी- देशभक्तीचे सूर, तिरंग्याची शान, आणि प्रेरणेचा अविरत प्रवाह अशा वातावरणात श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, राजूर संचलित श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, मवेशी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात, देशप्रेमाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
अपंगत्वावर मात करून भारतातील अनेक गड-किल्ल्यांवर स्वखर्चाने आणि न थकता चढाई करणारे केशव भांगरे हे खऱ्या अर्थाने "जिद्दीचे पर्यायवाची" ठरले आहेत. त्यांचे हे साहसी कार्य केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवून जागतिक पातळीवर पोहोचले आहे. आपल्या भाषणात त्यांनी बालपणातील संघर्ष, शारीरिक अडचणींवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न, आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मानसिक ताकद याविषयी हृदयस्पर्शी व प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या.
त्यांचे शब्द ऐकताना विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर हे सर्व भारावून गेले. "अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात," हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोंडोपंत बांबळे होते. यावेळी पांडुरंग भांगरे, शरदभाऊ कोंडार आणि भास्कर भांगरे सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि एकजूट यांचे संस्कार रोवले. विशेषतः भास्कर भांगरे सरांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीकरिता कवायतीसाठी डंबेल्स आणि घुंगुरकाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमात विद्यार्थिनी कोमल सदगीर, नयना सदगीर, शैला भांगरे, तसेच गणेश भांगरे, निलम शिंदे, दिव्या वाळेकर यांनी आपल्या प्रभावी मनोगतातून स्वातंत्र्य दिनाचा इतिहास, बलिदानाची गाथा आणि स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मवेशी परिसरातील मान्यवर,विलास बांबळे, संतोष साबळे, गोपीनाथ धिंदळे, यमाजी कोंडार, सुरेश भांगरे, तसेच ग्रामपंचायत सरपंच पद्मिनी ताई भांडकोळी हे उपस्थित होते. देशमुख सर यांनी सूत्रसंचालन केले मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्य दिनाचा ऐतिहासिक संदर्भ, त्यामागील बलिदानींची आठवण आणि विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला. आव्हाड मॅडम यांनी मनःपूर्वक आभार मानले
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी आणि शालेय परिसरात फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने वातावरण अधिकच भारावले. स्वातंत्र्य दिन साजरा करताना केवळ देशभक्तीचा संदेशच नव्हे तर आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी ती जिद्दीने पार करण्याची प्रेरणा देखील विद्यार्थ्यांच्या मनात रुजली.