विद्यार्थ्यांनी स्वतःची वाट स्वतःच निर्माण करावी-एच आर मॅनेजर कोळगे
मार्ग यशाचा या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान
आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज आणि जे के मैनी प्रिसीजन टेक्नॉलॉजी सिन्नर यांचा सामंजस्य करार
अकोले प्रतिनिधी-
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय आपणच ठरवा,आपली स्वतःची वाट स्वतःच निर्माण करा आणि त्यासाठी मनात यशस्वी होण्याचा निश्चय केल्यास तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन जेके मैनीप्रिसीजन टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनी,सिन्नर चे डेप्युटी जनरल मॅनेजर( एच आर) श्री नानासाहेब कोळगे यांनी केले.
आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचलित आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज वीरगाव येथे मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये ' मार्ग यशाचा 'या विषयावर व्याख्यान देताना श्री कोळगे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते. यावेळी व्यासपीठावर युथ स्किल फाउंडेशन चे अधिकारी नवनाथ भराडे,विजय माशेरे,संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.अनिल रहाणे,संचालक शिवराज वाकचौरे, अक्षय रहाणे,प्राचार्य मिलिंद सुर्वे,समन्वयक विद्याचंद्र सातपुते,सर्व प्राध्यापक ,पॉलिटेक्निक कॉलेज व मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.कोळगे पुढे म्हणाले की, कोणत्याही घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.जीवनात काय करायचे हे अगोदर ठरविले पाहिजे. ध्येय नसेल तर आपण जीवनात यशस्वी होऊच शकत नाही.आपले ध्येय ठरविण्यापूर्वी,मार्ग निवडण्यापूर्वी आपण स्वतः ला ओळखले पाहिजे,आपली ताकद काय आहे? आपल्याला कशाची आवड आहे,आपली क्षमता काय आहे हे पाहणे गरजेचे आहे.आपल्याकडे आत्मविश्वास असेल, सकारात्मक विचार सरणी असेल व आपण एकदा निश्चय केला तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.आपण कितीही यशस्वी झालो तरी आपण नवीन व सतत शिकत राहीले पाहिजे एक नंबर ने यशस्वी होतात तेच लक्षात राहतात.आपल्या अवतीभवती असलेल्या यशस्वी लोकांचे निरीक्षण करा. त्यांच्या यशामागे असलेला त्यांचा संघर्ष पहावा. यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन असणे महत्वाचे आहे.चांगल्या विचारांची सवयी असेल तर कृती सुद्धा चांगलीच घडत असते. आपली तुलना कोणाशीही करू नका,दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे ते शोधा,आपल्या यशाची वाट आपण स्वतः निर्माण करावी. यश सहजासहजी मिळत नाही.त्या साठी आत्मपरीक्षण करावे,परिश्रम घ्यावे,आपल्याला फक्त आपणच यशस्वी बनवू शकतो,दुसरा कोणीही नाही हे लक्षात ठेवून आपले ध्येय गाठावे असे सांगितले.
यावेळी संस्थचे संस्थापक सेक्रेटरी डॉ. अनिल रहाणे म्हणाले की,या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे करियर घडविणे हे संस्थेचे मुख्य ध्येय असून त्यादृष्टीने संस्था सर्व पातळीवर कार्यरत आहे. मात्र त्या साठी विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून आपले ध्येय गाठावे आणि आपल्या आई वडिलांचे,संस्थेचे स्वप्न पूर्ण करावे.आजचे व्याख्यान विदयार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे असेल असा विश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून संस्थेने कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. असे मत व्यक्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक व तंत्रज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धा व पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी चे वाटप करून सन्मान करण्यात आला.
तसेच या वेळी या महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना भविष्यात नोकरीची संधी,इंडस्ट्रील व्हिजिट,इंटरशीप,मार्गदर्शन हे मिळावे या दृष्टीने जे के मैनी कंपनी व आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज वीरगाव यांच्या मध्ये सांमजस्य करार करण्यात आला.
स्वागत,प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय समन्वयक विद्याचंद्र सातपुते यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता आंबरे यांनी केले तर आभार झरेज बागवान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी- विद्यार्थ्यांनीनी विशेष परिश्रम घेतले.