जीवन शिक्षणाचे धडे झेडपी शाळेतून मिळतात- सिद्धार्थ मोरे


 जीवन शिक्षणाचे धडे झेडपी शाळेतून मिळतात- सिद्धार्थ मोरे

अकोले :-

जीवनाचा सर्वांगीन विकास हा जिल्हा परिषद शाळेतून होत असतो. मनसोक्त खेळायचे, अभ्यास करायचा, विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा, कोणताही दबाव नाही, जे जगण्याला पुरक जीवन असते त्याचा उपभोग झेडपीच्या शाळेत घेता येतो असे मत अकोले तालुक्याचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे यांनी केले. ते गुरूवार दि. ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी आयोजित केलेल्या जिल्हा परिषद प्रामथमिक शाळा उंचखडक बु येथील बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून विस्तार अधिकारी माधव हासे, विठ्ठल पंत महाराज, सोपान देशमुख तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब खरात होते.  

तहसिलदार मोरे म्हणाले की, मला हा उपक्रम फार आवडला आहे. मुलांनी त्यांच्या शेतातील भाजीपाला आणला, तो व्यवस्थित मांडला, त्याचा बाजारभाव ठरविला, आपला शेतमाल खपविण्यासाठी त्यांची धडपड दिसून आली हे फार उत्सुकतेचे वाटले. या वयात त्यांना आर्थिक ज्ञान आले पाहिजे, त्यांना व्यवहाराचे प्रत्यक्ष अकलन झाले पाहिजे, मापन प्रक्रिया, आर्थिक उलाढाल, शेती आणि त्यातून मिळणारे उत्पन्न तसेच शेतकर्‍यांची कथा आणि व्यथा यांची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी केलेली धडपड फार वाखान्याजोगी आहे. ही मुले आज इयत्ता १ ली ते ४ थीच्या वर्गात असताना हे ज्ञान संपादन करीत असतील. तर, ही मुले माध्यमिक विद्यालयात गेल्यानंतर यांच्यातील गुणवत्ता आणि प्रत्यक्ष जगणे यात फार सकारात्मक बदल दिसणार आहेत. लहान मुले ही भारताचे भविष्य आहे, जीवन जगत असताना किती संघर्ष करावा लागतो याची जाण जर तुम्ही आत्ताच करुन दिली. तर नक्कीच आपल्या शाळेतील मुले भविष्यात त्यांच्या कुटुंबाला उभे करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. सागर शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक रवी रुपवते, देविदास गिर्‍हे, अभिजित देशमुख, सागर देशमुख, शितल देशमुख, हर्षता देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.  



तहसिलदारांनी केला मराठी शाळेत बाजार

सिद्धार्थ मोरे यांनी बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणलेला ताजा भाजीपाला पाहून स्वत: खरेदी करण्यास सुरूवात केली. भाजीपाला देण्यासाठी मुलांनी प्लॅस्टीक पिशवी ऐवजी कागदी पिशव्यांचा वापर केल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. हरभर्‍याची भाजी, लसून, मेथी, भेंड्या असा दोनशे ते अडिचशे रूपयांचा भाजापाला तहसिलदार महोदयांनी खरेदी केला. विद्यार्थ्यांशी हितगुज साधत त्यांना नकळत व्यवहारज्ञानाचे धडे दिले. बाजारात देखील इतका ताजा आणि टवटवीत भाजापाला मिळत नाही. इतका सुंदर बाजार विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तसेच एसएमसीने भरविला हे फार कौतुकास्पद आहे.

लोकसहभागाचे हे सर्वेत्तम उदाहरण..

बंद पडलेली शाळा लोकसहभागातून उभी रहाते, त्यानंतर इंग्रजी माध्यमांची मुले मराठी शाळेत येतात, एक वर्षात शाळेची निवड राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी होते, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा यात प्रथम क्रमांक येतो, न्यायाधिशांच्या हस्ते आयएसओ मानांकन मिळते, शाळा राज्याच्या पटलावर येते, शुन्याचा पट असणारी शाळा ५० पटापर्यंत जाते यापेक्षा आणखी बदल हवा? केवळ लोकसहभाग, चांगले शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने केले काम यातून शाळेंचा विकास होऊ शकतो हे सिद्ध होते. जेव्हा पालक, शिक्षक आणि एसएमसी त्यांचे कार्य चोखपणे पार पाडते तेव्हा उंचखडक बु सारखी शाळा जन्म घेते.  सिद्धार्थ मोरे (तहसिलदार अकोले)

 



आज शाळेत खाऊगल्लीचा उपक्रम

बाल आनंद मेळाव्याच्या दुसर्‍या दिवशी शाळेत खाऊगल्ली उपक्रम घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना जे काही पदार्थ उत्तम रित्या बनविता येतात त्यांचे स्टॅल शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता लावण्यात येणार आहे. त्यात इडली, पाणीपुरी, बेसन भाकर, खिर, आईस्क्रिम, वडे, समोसे, लस्सी, पावभाजी, शेवभाजी, पॅटीस, न्युडल्स, स्वायाबीन चिली, बिर्यानी अशा अनेक पदार्थाचा सामावेश होणार आहे. जसे भाजीपाला घेण्यासाठी तालुक्यातून काही लोक आले होते. तसे खाऊगल्लीचा अस्वाद घेण्यासाठी यावे असे अवाहन मुख्याध्यापक रवि रुपवते सर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post