अकोलेकरांनी अनुभवली आगळीवेगळी | जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती
अकोले (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा मान,महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा गौरव व आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अभिनव शिक्षण संस्था, बुवासाहेब नवले पतसंस्था, बुवासाहेब नवले मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप.सोसायटी, अकोले वि.का.से.सोसायटी, सिद्धेश्वर दूध उत्पादक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय उत्साहात संपन्न झाली.
ही आगळीवेगळी जयंती अकोलेकरांनी अनुभवली. अभिनव शिक्षण संस्था ते बुवासाहेब नवले पतसंस्था या मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात अभिनवच्या विद्यार्थ्यांचे लेझीम, झांजपथक व अभिनव चा शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ व बुवासाहेब नवले पतसंस्था स्टाफ यांचा सहभाग असलेल्या भव्य बाईक रॅलीचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले व त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शरद नवले, नगरसेवक सागर चौधरी, पत्रकार अमोल वैद्य,रोटरी क्लब चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेशराव जगताप, अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा तथा कॅम्पस डायरेक्टर प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे अध्यक्ष व अभिनव शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष विक्रमराव नवले, सहसचिव प्राचार्या अल्फोन्सा डी.,मल्टिस्टेट चे उपाध्यक्ष नवनाथ वाळुंज, अगस्ति चे माजी संचालक बाळासाहेब ताजणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अभिनव च्या विद्यार्थ्यांच्या लेझीम व झांजपथकाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने शिवआरती सादर करून शिवरायांना वंदन केले. त्यानंतर राज्यगीताने पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेशराव जगताप यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे स्वागत केले.व सर्वांना शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. जयश्री देशमुख यांनी प्रास्ताविकातून उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना छत्रपती शिवरायांचे आचार विचार प्रत्येकाने आपल्या आचरणात जीवंत ठेवावे अशी कळकळीची विनंती केली. याप्रसंगी अभिनव शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला 'शिवकल्याण राजा शिवछत्रपती' हा गायन,वादन, नृत्य,अभिनयाने बहरलेला संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला.
अभिनवच्या विद्यार्थ्यांनी रोपयोगा, स्तंभ मल्लखांब, शिवकालीन दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी या साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यासाठी अभिनव शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बुवासाहेब नवले पतसंस्था, बुवासाहेब नवले मल्टीस्टेट, अकोले वि.का.सोसायटी, सिद्धेश्वर दूध उत्पादक संस्था या सर्व संस्थांचे पदाधिकारी व सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिनव शिक्षण संस्थेचा सांस्कृतिक विभाग, कला विभाग, क्रीडा विभाग व आय टी. विभाग तसेच बुवासाहेब नवले पतसंस्था कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हेमंत मंडलिक यांनी केले.



