श्री शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती नाचुन नाही तर वाचुन साजरी
अकोले (प्रतिनिधी)- श्री शिवशंभु प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य आणि हिंदुराजा फाउंडेशन अकोले यांच्या वतीने शिवरायांचे विचार व कार्य तरूणांपर्यंत जावे या कार्याच्या माध्यमातून तरूणांनी शिवरायांच्या विचारांना गती द्यावी या हेतुने या प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात अंबाजोगाई, वडुज सातारा, पुणे-पिंपरी चिंचवड, जळगाव (जामोद) बुलढाणा, अकोले अहिल्यानगर, कोरेगाव सातारा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येवून शिवरायांच्या विचारांचा जागर केला.
छत्रपती शिवरायांच्या विचारांची व कार्याची ओळख तळागळापर्यंत जावी या हेतुने या श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि हिंदुराजा फाउंडेशन, अकोले यांनी संयुक्त विद्यमाने शिवरायांच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प हाती घेतला व त्या अनुषंगाने अकोले येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अकोले यांच्या वतीने शिवरायांच्या विचारांचा जागर करणारा उपक्रम हाती घेण्यात आला. शिवरायांचे गडकिल्ले यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत जावी व शाळेतील विद्यार्थ्यांना आपला इतिहास व छत्रपतींचे कार्य माहिती व्हावे व त्यांचे विचार त्या बालमनात रूजवावे त्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात स्वप्नील कारखानीस यांच्या नालंदा नोटबुक्स च्या गडकिल्ल्यांचे चित्रावर आधारीत वह्या व पुस्तकांचे वितरण करून त्यावर विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
शिवजंयती निमित्ताने काही संकल्प करण्यात आले. ज्यामध्ये शिवजयंती नाचुन नाही तर वाचून हा संकल्प हाती घेण्यात आला आहे. वैचारिक शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रतिष्ठानाने शाळा निवडल्या जेणे करून पुढच्या पिढीला प्रेरणा प्राप्त होईल. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचार कार्याबरोबरच गडकिल्ले यांची स्वच्छता राहावी असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आणि हा मुख्य संकल्प राबविण्यात आला आहे. हा संकल्प तरूणांसाठी असल्याने तरूणांनी या संकल्पात सहभागी होण्याचे व त्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने करण्यात आले आहे.
