१५ दिवसात अवैध दारू न थांबल्यास आंदोलनाचा आमदारांचा इशारा
अवैध दारू मिळत असणाऱ्या गावांची यादी देऊनही पोलिस आणि उत्पादनशुल्क विभाग ती दारू थांबवत नसतील तर आणखी १५ दिवस वाट बघून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मी स्वतः उपोषणा ला बसेल असा निर्वाणीचा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पोलिस व उत्पादनशुल्क विभागाला दिला.
अकोले तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक व दारुबंदी कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना जिथे दारू सुरू आहे तेथे काय कारवाई केली याचा जाब विचारला व संतापून निर्वाणीचा इशारा दिला.
ज्या दारू दुकानातून दारू येते त्या दुकानावर कारवाई का होत नाही ? ती कारवाई करून नियम मोडणाऱ्या परवाना धारक दुकानांना सील ठोका, जागा मालकावर गुन्हे दाखल करा आणि ज्या बीट मध्ये दारू सापडेल त्या बीट अंमलदारावर कारवाई झालीच पाहिजे असे अत्यंत आक्रमक होत त्यांनी आदेश दिले.
यावेळी प्रास्ताविक करताना हेरंब कुलकर्णी यांनी सरपंच व पोलिस पाटील यांनी अवैध धंदे चालवणाऱ्या व्यक्तींशी वाईटपणा घेण्याची तयारी दाखवावी व गावाला संघटित करून याविरुद्ध आक्रमक व्हावे, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करावे व गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करावे असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत यांनी तालुक्यातील जनतेच्या सहन शक्तीची परीक्षा बघू नये..अन्यथा तालुक्यातील जनता अधिकाऱ्यांविरुद्ध रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. मच्छिंद्र देशमुख यांनी लहान मुले नशेखोर शीतपेयाला बळी पडतात असे सांगितले.
यावेळी कार्यकर्ते नीलेश तळेकर, पत्रकार हेमंत आवारी,सुरेश नवले व विविध सरपंच उपसरपंच पोलिस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले..पोलिसांना अनेकदा तक्रारी करूनही पोलिस कारवाई करण्याची टाळाटाळ करतात, धाडी टाकण्याअगोदर अवैध दारू वाल्यांना फोन करतात...किती वेळा तक्रारी करायच्या अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या. उत्पादन शुल्क अधिकारी श्री सहस्त्रबुद्धे यांनी झालेल्या कारवायांची माहिती दिली व १५ दिवसात जास्तीत जास्त कारवाया केल्या जातील असे सांगितले पण त्यांना संतप्त सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
यावेळी ॲड वसंतराव मनकर,खंडूबाबा वाकचौरे, अनिल कोळपकर, भाऊसाहेब वाकचौरे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे व गटविकास अधिकारी श्री. माने उपस्थित होते.