अगस्ति च्या गणेशोत्सव मिरवणुकीने अकोलेकर सुखावले


 अगस्ति च्या गणेशोत्सव मिरवणुकीने अकोलेकर सुखावले 


अकोले -- श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ति विद्यालयाची श्री गणेश विसर्जन मिरवणुक यंदाही आपली तब्बल 60 वर्षांची परंपरा कायम ठेवत दिमाखदार पध्दतीने विविध नृत्याचे सादरीकरण करत चिमुरड्या विद्यार्थ्यांनी अकोलेकरांची वाहवा मिळवत रंगत वाढविली आणि अकोलेकर सुखावले .श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी , थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा आपली लोककला , लोकसंस्कृती आणि त्यातून सामाजिक प्रबोधन होण्याच्या दृष्टीने आजही संस्थेच्या माध्यमातून त्या विचारांची जोपासना होत असल्याचे दिसून येते. शहरात एस टी स्टँड जवळ व नगरपंचायत चौकात भरगच्च कार्यक्रमाचे सादरीकरण करत अगस्ति विद्यालयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.गणेशवंदना , डोळ्यांचे पारणे फेडणारे 70  मुलींचे तालबद्ध ढोलपथक ,लेझीम मुले साधा , मुली कोल्हापुरी पद्धतीचे लेझीम तर शिक्षकांचे गावठी (घाटी ) लेझीम , मुलींच्या टिपऱ्या , झांज पथक, झेंडा नृत्य , दुर्मिळ असे आदिवासी तारपा नृत्य , महाराष्ट्राची संत परंपरा जपणारी दिंडी , महिला भगिनींचे आवडते मंगळागौर तर स्वर्गीय बाबांनी स्वतः लाठीकाठी,चक्र व टेंभा असे अत्यंत थक्क करणारे खेळ प्रकार खेळत असत.




त्यावेळी त्यांनी  दाखवुन दिलेला हा कलाप्रकार आजही विद्यालय सादर करून बाबांच्या आठवणी जागवत असतांना दिसून येते.गणेशोत्सव मिरवणुकीपूर्वी विद्यालयात महाआरतीचा मान मिळालेले तालुक्याचे आमदार डॉ किरणजी लहामटे , त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे व योगीकेशवबाबा चौधरी यांचे हस्ते पूजा संपन्नहोऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला.यावेळी पी आय मोहन बोरसे , ऍड वसंत मनकर डॉ संदीप कडलग, महेश नवले , मनोज मोरे ,दत्ता नवले  , अक्षय आभाळे, माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊसाहेब पारदे , नितीन नाईकवाडी , हरिभाऊ फापाळे , नगरसेवक विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यालयाची विद्यार्थीनी श्रावणी फरताळे हिने ढोलपथकाच्या ठेक्यावर केरळमधील प्रसिद्ध असा कांतारा हा नृत्यप्रकार सादर करत आपल्या कलेचा आविष्कार सर्वांसमोर प्रदर्शित केला.

सर्वच नृत्यप्रकार कमालीचे रंगतदार पध्दतीने सादर होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा , एस टी स्टँड , नगरपंचायत चौक याठिकाणी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केल्याने व प्रत्येक नृत्य प्रकाराला भरभरून दाद मिळाल्याने विद्यार्थी अत्यंत उत्साहाने भर पावसात ही आपली कला सादर करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. वरूनराजाच्या आगमनाने प्रेक्षकवर्ग सुद्धा विचलित न होता सर्व कार्यक्रमांचा आनंद घेत होता.नगरपंचायत चौकात नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे , उपनगराध्यक्ष शरद नवले , मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी अगस्ति विद्यालयाच्या गणेशोत्सव मिरवणुकीचे स्वागत करत संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी , सेक्रेटरी शैलजा पोखरकर, प्राचार्य मंगेश खांबेकर यांचा स्मृतिचिन्ह देत सन्मान केला.नगरसेवक विजय पवार यांनीही संस्था पदाधिकारी व प्राचार्य यांचा सन्मान केला .या मिरवणुकीत संस्थेतील माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संपतराव नाईकवाडी , शिवाजी चौधरी , शिवाजी धुमाळ , सुरेश कोकणे, माजी कलाशिक्षक प्रविण घुले ,लक्ष्मन आल्हाट  यांचेसह शिक्षक सुद्धा उपस्थित राहून अभिमानाने स्वर्गीय बा ह नाईकवाडी , स्वर्गीय दुर्गाबाई नाईकवाडी यांनी घालून दिलेल्या आदर्शवत संस्काराचे पालन करत सांस्कृतिक उत्सवात सहभागी झाले होते. 

भारतीय संस्कृती व परंपरा जपून नवीन पिढीला योग्य सन्मार्ग दाखवून लोकशिक्षण देण्याचे काम संस्था करत असून बाबांच्या विचारांची पताका हाती  घेऊन वाटचाल करीत आहे .गणरायावर असणारी बाबांची भक्ती अपार व निस्सीम होती.आपल्या कला जोपासून लोकचळवळ अधिक समाजाभिमुख करण्यासाठी सर्वच कर्मचारी संत परंपरेचे पाईक म्हणून कटिबद्ध असल्याचे दिसून येते व आजही अगस्ति ची श्रींची विसर्जन मिरवणुक अकोलेकरांसाठी पर्वणी ठरत असल्याचे या सर्व कार्यक्रमातुन स्पष्ट दिसते.मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मंगेश खांबेकर , उपमुख्यध्यापक संजय शिंदे , पर्यवेक्षक नंदा गोपाळे , शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ, माता पालक संघ समितीचे सर्व पदाधिकारी , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post