महिलांचा आदर आणि सन्मान करणं म्हणजे समाजाचं खऱ्या अर्थानं उन्नतीकडे वाटचाल करणे : राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे
अकोले (प्रतिनिधी)
महिलांचा आदर आणि सन्मान करणं म्हणजे समाजाचं खऱ्या अर्थानं उन्नतीकडे वाटचाल करणे आहे.त्या केवळ आई,बहीण, पत्नी किंवा मुलगी नाहीत तर त्या समाजाची खरी ताकद आहेत असे प्रतिपादन राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी केले.
अकोले तालुक्यातील ढोकरी येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त वाबळे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना वाबळे महाराज म्हणाले की, महिलांमध्ये सामर्थ्य, धैर्य, आत्मविश्वास आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता असते म्हणूनच त्यांच्या पोटी शिवराय आणि बाबासाहेब अशा थोर विभूती जन्माला येतात. त्या समाजाची खरी ताकद आहेत असे सांगतानाच वाबळे महाराज यांनी आपल्या गोड व पहाडी आवाजात छत्रपती शिवराय यांचा पोवाडा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी गीते गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
स्वरचित गीतातून त्यांनी शिक्षणाचे महत्व विषद केले.शिक्षण हेच सर्वांगीण परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. शिक्षण हेच मानवाला खऱ्या अर्थाने उभे करते असे सांगतानाच गावात मंदिरे झाली आता आधुनिक ज्ञानमंदिरे नव्याने उभारा गरिबांच्या जिल्हा परिषद शाळा वाचवा याकडे ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान योद्धा, कुशल प्रशासक व आदर्श राजा होते.शिवाजी महाराजांचे शौर्य, कर्तृत्व आणि महिलांविषयी आदराची भावना प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे असे सांगतानाच भारतीय संविधानात सर्व नागरिकांसाठी समानता, धर्मस्वातंत्र्य, आणि मूलभूत हक्क दिले म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव ठरतात असे वाबळे महाराज यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी वाबळे महाराज आणि उपस्थित संत रवीमामा यांचा सत्कार केला.या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
